टीव्ही

जसा आणला टीव्ही खुद्कन
हसले माझे घर
जरी शांतता हरवुन गेली
हसतो मी वर वर

शुभंकरोती सायंकाळी
म्हणावयाचा तो
नातू ऐकुन कथा पर्‍यांच्या
रमावयाचा तो
अ‍ॅड अताशा म्हणतो निरमा
धुण्याची पावडर
जरी शांतता हरवुन गेली
हसतो मी वर वर

एकामागुन एक मालिका
दंग किती सारे !
नात्यांमधले उडून गेले
रंग किती प्यारे !
संवादाला कुटुंबातल्या
लागलीय घरघर
जरी शांतता हरवुन गेली
हसतो मी वर वर

उशीर होता घरी यावया
मालिकात रमते
लवकर माझे येणे तिजला
जरा कमी गमते
तिला वाटते बनलो आहे
मी सीरियल किलर
जरी शांतता हरवुन गेली
हसतो मी वर वर

जाहिरात चालू असताना
स्वयंपाक झटपट
दुपारचे ते गरम करूनी
वाढते पटापट
कुणी करावी आवडते ते
रांधण्यास मर मर?
जरी शांतता हरवुन गेली
हसतो मी वर वर

दिशा बघूनी वार्‍याची मी
वागू असे कसे?
खुंटीवरती मुल्यांना मी
टांगू असे कसे?
जहाज बुडते दिसता होते
काळजात थर थर
जरी शांतता हरवुन गेली
हसतो मी वर वर

No comments:

Post a Comment